राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत लढणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत किमान 50 जागांवर तयारी पूर्ण केली आहे. पक्षाच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत दोन्ही पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, अंतिम निर्णय अजित पवार घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी मतदान होणार आहे.
-
अर्ज स्वीकारण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर
-
अर्ज छाननी : 31 डिसेंबर
-
उमेदवारी माघार : 2 जानेवारी 2026
-
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी
-
मतदान : 15 जानेवारी 2026
-
मतमोजणी : 16 जानेवारी 2026
या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार असून, उमेदवारांना निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
अमित शाह यांची राष्ट्रवादी नेत्यांसोबत भेट
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. जिथे शक्य आहे तिथे युती करून निवडणूक लढवा, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटासोबत युती झाल्यासही भाजपला कोणतीही अडचण नसल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. या भेटीनंतर राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप, स्थानिक समीकरणे आणि विरोधकांची रणनीती यामुळे येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.














