महाराष्ट्रातील तरुणाईची लाडकी अदाकारा आणि नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या नेहमीच चर्चेत असते. तिचा कार्यक्रम जिथे असेल, तिथे प्रेक्षकांची गर्दी होणं ठरलेलंच. आपल्या खास नृत्यशैलीने आणि स्टेजवरील ऊर्जा भरलेल्या परफॉर्मन्समुळे गौतमीने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
स्टेज शोजमधून नाव कमावलेल्या गौतमी पाटीलने आता मनोरंजन विश्वातही आपली ओळख निर्माण केली आहे. तिने चित्रपटांमध्ये काम केलं असून काही आयटम साँग्स आणि म्युझिक अल्बम्समधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे तिच्याबद्दलच्या चर्चा नेहमीच रंगताना दिसतात.
अलीकडेच ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात गौतमी पाटील सहभागी होणार अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या. याआधीही बिग बॉस मराठीच्या मागील सीझनदरम्यान अशीच चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी गौतमीने या अफवांना नकार दिला होता.
दरम्यान, एका खास मुलाखतीत गौतमी पाटीलने या चर्चांवर स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. तिने ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचं कौतुक करताना स्पष्ट केलं की, तिला पूर्वी शोसाठी संपर्क करण्यात आला होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे तिने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
गौतमीने सांगितलं की, ती आपल्या आईपासून जास्त काळ दूर राहू शकत नाही. काही दिवसांपेक्षा जास्त काळ आईशिवाय राहणं तिच्यासाठी कठीण असल्यामुळे तिने बिग बॉसच्या घरात जाण्याचा विचार सोडून दिला. मात्र तिने हेही मान्य केलं की, बिग बॉससारख्या शोमुळे कलाकारांना मोठी ओळख आणि करिअरची संधी मिळते.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी 6’चा प्रोमो प्रदर्शित झाला असून 11 जानेवारीपासून नवा सीझन सुरू होणार आहे. यंदा घरात कोणते स्पर्धक दिसणार याबाबत अजूनही उत्सुकता कायम आहे. गौतमी पाटीलचा सहभाग असणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.














