यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वाळू तस्करीविरोधातील कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. मोरथ–वाकोडी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाड टाकली. मात्र कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच काही तस्करांनी हल्ला केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.
हल्लेखोरांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी पोलिसांना हवेत दोन राऊंड गोळीबार करावा लागला. गोळीबारानंतर तस्कर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे जखमी झाले असून त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.
ही घटना सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महागाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नदीपात्रात ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती उपसा सुरू होता. काही ट्रॅक्टर भरलेले तर काही रिकामे होते. याचवेळी पोलिस पथक तेथे पोहोचले असता ट्रॅक्टर चालकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही जणांनी थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात एका तरुणाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संबंधित आरोपींच्या नातेवाईकांचीही चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास महागाव पोलीस करत आहेत.
हेही वाचा :- “बिग बॉस मराठी 6 मध्ये गौतमी पाटील? स्वतः अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर”














