राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावण्यात आलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवली असून, त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर कोकाटेंविरोधात अटक कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढावे, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा अर्ज अंजली दिघोळे यांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केला असून, त्यावर न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर अटक वॉरंट जारी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोठी अडचण ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवारांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली.
मंत्रीपदाचा निर्णय हा अजित पवारांनीच घ्यावा, असे सांगत फडणवीस यांनी थेट प्रश्न विचारला की, माणिकराव कोकाटे यांचे खाते आता कुणाला द्यायचे? जर उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली, तर कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते. मात्र, तसे न झाल्यास खात्याची जबाबदारी कोणाकडे द्यायची, याचा निर्णय तातडीने घ्यावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
नेमकं प्रकरण काय आहे?
सुमारे 30 वर्षांपूर्वी नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ‘न्यू अपार्टमेंट’मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी राखीव सदनिका माणिकराव कोकाटे यांनी मिळवली होती. स्वतः कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे तसेच पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चौघांनी मुख्यमंत्री कोट्यातून या सदनिका मिळवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व 50 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शिक्षेला दुजोरा दिला आहे.
यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














