राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत AI आधारित प्रणाली राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास सेवा गुणवत्ता वाढेल, तसेच प्रशासन अधिक कार्यक्षम होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, सेवा गुणवत्ता समीक्षा, आरोग्य हेल्पलाइन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि कार्यप्रदर्शन मूल्यांकन यासारख्या बाबींचे सादरीकरण करण्यात आले. यासोबतच आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी नवीन पदनिर्मिती, मनुष्यबळ भरती आणि प्रशिक्षणावर भर देण्याबाबतही चर्चा झाली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘आपलं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ योजना, पॉलिएटिव्ह केअर, सिकलसेल आजारावरील उपाययोजना, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ करणे, मानधनवाढ तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मागण्या मांडल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
या बैठकीस आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.














