मुंबई : क्रिकेट आणि फुटबॉल या दोन वेगवेगळ्या विश्वांतील दिग्गज खेळाडू एकाच मंचावर आल्याचा अविस्मरणीय क्षण मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाला. क्रिकेटविश्वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा जागतिक सुपरस्टार लिओनेल मेस्सी यांची भेट क्रीडाप्रेमींसाठी खास ठरली.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या मेस्सीच्या उपस्थितीमुळे वानखेडे स्टेडियममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या भेटीदरम्यान सचिन तेंडुलकर यांनी मेस्सीला १० क्रमांकाची खास जर्सी भेट दिली. दोन्ही खेळाडूंमधील हा सन्मान आणि आपुलकीचा क्षण पाहताना उपस्थित चाहते भारावून गेले.
क्रिकेटचा ‘मास्टर ब्लास्टर’ आणि फुटबॉलचा ‘मॅजिक मॅन’ एकत्र दिसल्याने हा क्षण केवळ एक भेट न राहता, क्रीडा इतिहासातील स्मरणीय घटना ठरली आहे. सोशल मीडियावरही या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या क्षणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.














