जेजुरी नगरपरिषद निकालानंतर काय घडलं?
भंडाऱ्याच्या उधळणीत आग कशी लागली? (Jejuri fire incident)
Jejuri Fire incident:
जेजुरी नगरपरिषदेच्या निकालानंतर सुरू असलेल्या विजय सोहळ्याला अचानक दुर्घटनेचं गालबोट लागलं. गडाच्या पायथ्याशी खंडेरायाच्या चरणी भंडारा अर्पण करताना फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. याच दरम्यान भंडाऱ्याच्या उधळणीत अचानक आगीचा भडका उडाल्याची घटना घडली.
या दुर्घटनेत एकूण 16 जण भाजले गेले असून, त्यामध्ये नुकतेच निवडून आलेले काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ जेजुरी तसेच पुण्यातील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भंडाऱ्यात वापरण्यात आलेल्या साहित्याच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, जेजुरी नगरपरिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदासाठी जयदीप बारभाई यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक निवडून आले आहेत. या विजयानंतर शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत होता.
या घटनेमुळे आनंदाच्या क्षणीही सुरक्षेचे नियम आणि पारंपरिक विधींमध्ये खबरदारी किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा:– मोठी राजकीय हालचाल : नवी मुंबईत शरद पवार गटाला झटका, संदीप नाईक भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत














